गीताई: अध्याय पाचवा
भग्वदगीतेचे मराठी भाषांतर हे विनोबा भावेंनी त्यांच्या आईला समजावे म्हणून केले. तेही केवळ ४ महिन्यांत. त्यांच्यामते गीताईतील चवथ्या अध्यायातील १८ वा श्लोक आणि पाचवा अध्याय अतिशय भावपूर्ण आहे.
अध्याय ४ श्लोक १८
कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे ।
तो बुद्धीमंत लोकांत तो योगी कृतकृत्य तो ॥ १८ ॥
अध्याय ५
अर्जुन म्हणाला,
कृष्णा संन्यास कर्माचा तसा योग हि सांगसी । दोहोत जे बरे एक सांग ते मज निश्चित ॥ १ ॥
श्री भगवान् म्हणाले,
योग संन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग संन्यासाहूनि मानिला ॥ २ ॥
तो जाण नित्य-संन्यासी राग-द्वेष नसे जया । जो द्वंद्वावेगळा झाला सुखे बंधांतुनी सुटे ॥ ३ ॥
म्हणती सांख्य-योगाते भिन्न मूढ न जाणते । बाणो एक हि ती निष्ठा दोहींचे फळ देतसे ॥ ४ ॥
सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यास हि लाभते । एक-रूप चि हे दोन्ही जो पाहे तो चि पाहतो ॥ ५ ।
योगावांचूनि संन्यास कधी साधे चि ना सुखे । संयमी योग जोडूनि ब्रम्ह शीघ्र चि गाठतो ॥ ६ ॥
अंतरी धुतला योगी जिंकूनि मन इंद्रिये । झाला जीव चि भूतांचा करूनि हि अलिप्त तो ॥ ७ ॥
न काही मी करी ऐसे योगी तत्त्व-ज्ञ जाणुनी । देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजे श्वसे ॥ ८ ॥
बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी । इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे चि पाहतो ॥ ९ ॥
ब्रम्ही ठेऊनिया कर्मे संग सोडूनि जो करी । पापे न लिप्त तो होय पद्म-पत्र जसे जळे ॥ १० ॥
देहा-मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ । आत्म-शुद्ध्यर्थ नि:संग योगी कर्म अनुष्ठिती ॥ ११ ॥
युक्त तो फळ सोडूनि शांति निश्चळ पावतो । अयुक्त स्वैर-वृत्तीने फळी आसक्त बांधिला ॥ १२ ॥
मनाने सगळी कर्मे सोडुनी संयमी सुखे । नव-द्वार-पुरी राहे करी ना करवी हि ना ॥ १३ ॥
न कर्तेपण लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभु । न कर्मी फल-संयोग स्वभावे सर्व होतसे ॥ १४ ॥
न घे पाप हि कोणाचे न वा पुण्य हि तो विभु । अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित ॥ १५ ॥
गेले अज्ञान ते ज्यांचे आत्म-ज्ञाने तयां मग । पर-ब्रम्ह दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले ॥ १६ ॥
रंगले त्यात ओतूनि बुद्धि निश्चय जीवन । पुन्हा येती न माघारे ज्ञाने पाप धुऊनिया ॥ १७ ॥
विद्या-विनय-संपन्न द्विज गाय तसा गज । श्वान चांडाळ हे सारे तत्त्व-ज्ञ सम पाहती ॥ १८ ॥
इथे चि जिंकिला जन्म समत्वी मन रोवुनी । निर्दोष सम जे ब्रम्ह झाले तेथे चि ते स्थिर ॥ १९ ॥
प्रिय-लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये । बुद्धि निश्चळ निर्मोह ब्रम्ही ज्ञानी स्थिरावला ॥ २० ॥
विटला विषयी जाणे अंतरी सुख काय ते । ब्रम्ही मिसळला तेंव्हा भोगी ते सुख अक्षय ॥ २१ ॥
विषयातील जे भोग ते दु:खास चि कारण । येती जसे तसे जाती विवेकी न रमे तिथे ॥ २२ ॥
प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके । काम-क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी ॥ २३ ॥
प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया । ब्रम्ह होऊनि तो योगी ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ २४ ॥
फिटले दोष शंका हि मुठीत धरिले मन । पावले ब्रम्ह-निर्वाण ज्ञानी विश्व-हिती रत ॥ २५ ॥
काम-क्रोधास जिंकूनि यत्ने चित्तास बांधिती । देखती ब्रम्ह-निर्वाण आत्म-ज्ञानी चहूंकडे ॥ २६ ॥
विषयांचा बहिष्कार डोळा भ्रू-संगमी स्थिर । करूनि नासिका-स्थानी प्राणापान हि सारखे ॥ २७ ॥
आवरी मुनि मोक्षार्थी इंद्रिये मन बुद्धि जो । सोडी इच्छा भय-क्रोध सर्वदा सुटला चि तो ॥ २८ ॥
भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ २९ ॥
***** अध्याय पाचवा संपूर्ण *****
लेखक: विनोबा भावे
मला भग्वदगीतेचे सर्व अध्याय YouTube वर मराठीतून ऐकायला मिळाले. ती लिंक खाली देत आहे.
https://www.youtube.com/playlist?list=PLzz9KpK4CcMPrXbV7tOa2yBxtk-AL2SfS
PC: